नांदेड - नायगाव तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. दोन दिवस सलग वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने सोयाबीन, कापूस व ज्वारीची दाणादाण उडाली आहे. परिसरातील अनेक छोटे-मोठे ओढे व नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा - भारतीय हवाई दल दिन : तीनही दलाच्या प्रमुखांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली...
सतत बदलणाऱ्या निसर्गचक्रामुळे आधीच बळीराजा मेटाकुटीला आला आहे. कधी ऐन मोसमात रुसणारा तर कधी बेमोसमी बरसणारा पाऊस नेमका हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त करत आहे.
अशीच काहीशी परिस्थिती सध्या नायगाव तालुक्याच्या परिसरात आहे. जोर धरलेला पाऊस गेल्या काही दिवसात धो-धो बरसत आहे. अनेकांच्या शेतातील पिके पाण्यातच तरंगत आहेत. कोलंबी येथील शेतकरी प्रवीण बैस यांच्या शेतात कापसात गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके जाण्याची भीती व्यक्त होत आहे. नरसी, नायगाव परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
हेही वाचा - संघाच्या विजयादशमी उत्सवाला सुरुवात; रेशीमबागेत पथसंचलनाला आरंभ
या पावसाने कापूस, सोयाबीन, उडीद आणि ज्वारीची जोमदार पिके धोक्यात आली असून उत्पादनात घट होऊन बळीराजाला अर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. शेतातील सखल भागातील पिके आता पिवळी पडत आहेत.
दरम्यान, या पावसाने ग्रामीण भागातील छोटे, मोठे ओढे व गावालगत असणारे ओहोळ तुडूंब भरले असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी शेतातील पिकांची झालेली अवस्था अतिशय बिकट बनली आहे. एकीकडे विधानसभेची आचारसंहिता लागल्याने राजकीय मंडळी निवडणुकीत व्यग्र असून प्रशासन निवडणूक कामात गुंतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणालाही वेळ नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.