नांदेड - सध्या वाहनाच्या दुकानांमध्ये मिळणाऱ्या दुचाकी गाड्यांसह चारचाकी वाहने ही नवी-कोरी असली तरी, ती वाहने सेकंडहॅण्ड आहेत. हे ऐकून धक्का बसला असेल. मात्र, बीएस-४ मानांकन असलेल्या सर्व वाहनांच्या नोंदणीला सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. बीएस-४ मानांकन असलेली वाहने ३१ मार्चनंतर नोंदवण्यात येऊ नये, असे आदेशच न्यायालयाने दिले होते. मात्र, २२ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर झाले आणि वाहनविक्रेत्यांच्या दुकानात ही सर्व नवी वाहने तशीच राहिली.
पाडव्याला सर्वाधिक वाहनांची विक्री होते, पण यावेळचा पाडवा देखील लॉकडाऊनमध्येच पार पडला. त्यामुळे बीएस-४ व्हॅनची विक्री नगण्य झाली. परिणामी, वाहनविक्रेत्यांनी या गाड्या भंगारात विकण्याची वेळ येऊ नये म्हणून, नामी शक्कल लढवत सर्व बीएस-४ व्हॅनची नोंदणी स्वतःच्या आणि नातेवाइकांच्या नावावर ३१ मार्च पूर्वी करून घेतली. आता हीच सर्व वाहने डिलरच्या दुकानात विक्रीसाठी आहेत. आता तुम्हाला हे वाहन खरेदी करायचे असेल तर त्याची नोंदणी आधीच झाली असल्याने सेकंडहॅण्ड म्हणून खरेदी करावे लागणार आहे. म्हणजेच दिसायला नवी कोरी दिसणारी वाहने कायदेशीररित्या सेकंडहॅण्ड म्हणून खरेदी करावी लागणार आहेत.
नव्या कोऱ्या वाहनांची नोंदणी आधीच झाली असल्याने तुम्हाला पसंतीचा नंबर घेता येणार नाही, शिवाय इंश्युरन्स ट्रान्स्फर करताना गाडीची झीज देखील नोंदवली जाणार आहे. ३० मार्च रोजी एकट्या नांदेड जिल्ह्यात १ हजार ८९७ व्हॅनची नोंदणी झाली आणि त्यातून शासनाला १ कोटीपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे.