नांदेड - बहुचर्चित धान्य घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर वेणीकर यांनी १४ जूनला अटकपूर्व जामीन मागितला होता. बिलोली न्यायालयात या अर्जावर १९ जूनला सुनावणी होणार होती. परंतु, वेणीकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता ३ जुलैला सुनावणी होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की धान्य घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर तपास करण्यात आला. याप्रकरणी संतोष वेणीकर अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु, तपास अधिकाऱ्यांनी अहवाल सादर न केल्यामुळे ही सुनावणी २४ जूनपर्यत लांबविण्यात आली. २४ जूनला न्यायाधीश रजेवर असल्यामुळे सुनावणी झाली नाही. त्यावेळी सुनावणीसाठी २९ जून तारीख देण्यात आली होती.
सुनावणीत उपजिल्हाधिकारी तथा तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांच्या वकिलाने कृष्णूर धान्य घोटाळ्यात वेणीकर यांचा कुठलाच सहभाग नसल्याचे सांगितले. त्यावर याचिकाकर्ते महंमद आरिफ यांनी याच प्रकरणावर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर ५ जुलै रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्या सुनावणीमध्ये तपास अधिकारी कोणती बाजू मांडतात त्यावर आम्ही पुरवणी शपथपत्र किंवा आमची बाजू मांडण्यासाठी वेळ देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ३ जुलैला ठेवण्यात आली आहे.
तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची दाट शक्यता असल्याने बिलोली न्यायालयात मोठी गर्दी झाली होती.