नांदेड - आजपासून राज्यात कोरोना लसीच्या ड्रय रनला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या उपस्थितीत कोरोना लसीची रंगीत तालीम पार पडली. महापालिके शेजारी असलेल्या आरोग्य विभागाच्या इमारतीमध्ये ही रंगीत तालीम संपन्न झाली.
तपासणी करून लसीकरण
कोविड-19 लसीकरणासाठी शासनाने सुरक्षीततेच्या दृष्टीने योग्य खबरदारीच्या उपाययोजना घेतलेल्या आहेत. यात प्रामुख्याने ज्या व्यक्तीला लस देण्यासाठी निमंत्रित केले आहे. त्या व्यक्तींची ओळखपत्रासह द्विस्तरीय खात्री करुन घेणे, यात प्रामुख्याने प्रवेश करतेवेळी पोलीस अथवा सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून पूर्ण तपासणी झाल्यानंतरच त्या व्यक्तीला लसीकरण कक्षात सोडण्यात येणार आहे.
ऑनलाइन नोंदणीही करण्यात येईल
लसीकरण केंद्रात प्रवेश दिल्यानंतर लस देण्याआधी पुन्हा लस घेणाऱ्या व्यक्तीची ओळखपत्र तपासून खात्री करून घेतली जाईल. याचबरोबर ऑनलाईन नोंदणीही केली जाईल. संपूर्ण मोहिमेमध्ये पावलोपावली दक्षता घेण्याचे निर्देश शासनाने निर्गमित केलेले आहेत. आजच्या या रंगीत तालमीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या समक्ष खात्री करुन घेतली.
पहिल्या टप्प्यात 17 हजार 99 आरोग्य सेवकांना लस
या लसीकरनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील 17 हजार 99 आरोग्य सेवकांना ही लस दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सर्व विभागाची पाहणी केली. तत्पुर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी बाह्यरुग्ण तपासणी विभाग, नावनोंदणी विभाग व लसीकरन विभागातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.