नांदेड - देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर नांदेडमध्ये अडकून पडलेल्या पंजाबमधील यात्रेकरूंना वेगवेगळ्या ट्रॅव्हल्सद्वारे सोडण्यात आले होते. त्यापैकी तीन दिवसापूर्वी पंजाबमध्ये गेलेल्या तरणतारण जिल्ह्यातील सहा यात्रेकरूंना कोरोनाची लागण झाल्याचे काल रात्री उघड झाल्यानंतर पंजाब प्रशासनाने याबाबत खबरदारी घेतली आहे. उद्या पंजाबात पोहोचणाऱ्या सर्व यात्रेकरूंची कोरोना विषाणू संसर्गाची चाचणी करण्याची शक्यता आहे. त्यातच या नांदेडमध्ये यात्रेकरूच्या संपर्कात अनेकजण आले होते. नेमकी त्यांचीही तपासणी तितकीच महत्वाची ठरते. त्यांची तपासणी होणार काय? याबाबत सवाल उपस्थित होत आहे.
नांदेड येथे अडकलेले पंजाब येथील यात्रेकरू २५ एप्रिलला नांदेड येथून पहिल्या टप्प्यात पाठवण्यात आले. सोमवारी ते सकाळी तरणतारण जिल्ह्यात पोहोचल्यानंतर त्यांची स्वॅबची चाचणी करण्याचे ठरले. या चाचणीचे अहवाल सोमवारी सायंकाळी आले त्यानुसार नांदेड येथून परतलेल्या यात्रेकरूपैकी सहा जणांना कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्या सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, सोमवारी रात्री उशिरापर्यंत पंजाबकडे रवाना झालेल्या अडीच हजार यात्रेकरूंचा प्रवास सुरू झाला असून, पंजाब सरकारने राज्याच्या सीमेवरच किंवा ते पोहोचतील त्या गावाला वैद्यकीय पथक पाठवले आहे. या सर्वांची चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या संदर्भात ही चाचणी होणार असून, याबद्दल पंजाब सरकारने सर्वांना सतर्क केल्याचे वृत्त आहे. पंजाब पोलीस सर्व उपविभागीय अधिकारी तसेच आरोग्यव्यवस्था या सर्वांची टीम त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आणि उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल डिस्टन्स आणि आणि कुठल्याही उपाययोजना याठिकाणी करण्यात आल्या नव्हत्या.
तसेच पंजाब मधून प्रवास करून आलेल्या नांदेड येथील एका चालकाला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याने महापालिका आरोग्य यंत्रणेने काळजी घ्यायला हवी होती, मात्र ती घेतली गेली नाही. नांदेडमधून तरणतारण जिल्ह्यात गेलेल्या सहा जणांना कोरोना विषाणू संसर्गाची झालेली लागण ही बाब गंभीर मानली जाते दरम्यान जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती पुढे आली आहे.
श्रेय घेण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ -
पंजाब आणि हरियाणा राज्यातील साडे तीन ते चार हजार हे यात्रेकरू नांदेडमध्ये गेल्या चाळीस दिवसापासून अडकले होते. या यात्रेकरूना गावी पाठविण्यासाठी देशाचे गृहमंत्रालय, केंद्रातील मंत्री ते विविध राज्याचे मुख्यमंत्री यांची परवानगी घ्यावी लागली होती. मीच कशी परवानगी मिळवून दिली. याचे श्रेय घेण्यासाठी मोठी चढाओढ लागली होती. या यात्रेकरूसोबत बऱ्याच नेत्यांनी कुठलीही सुरक्षा न घेता फोटो सेशन केले. प्रशासनाकडूनही कुठलीही खबरदारी या ठिकाणी दिसून आली नाही. जर नांदेडमध्ये या यात्रेकरूना कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर याबाबतीत त्यांच्या संपर्कातील लोकांचीही तपासणी होणेही तितकेच महत्वाचे मानले जात आहे.