नांदेड - शहरासह जिल्हाभरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मत्र, अजूनही पावसाने नदी-नाल्याना पाणी आले नसल्याने कुठल्याही प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.
नांदेड जिल्ह्यात शुक्रवारपासूनच पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी लावली. कमी जास्त प्रमाणात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असून हा पाऊस पिकांना संजीवनी देणारा ठरत आहे.
यावर्षी मान्सून उशिराने दाखल झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या लांबल्या. पावसाळा उलटून दोन महिने होत असले तरी अद्याप समाधानकारक पाऊस बरसलेला नव्हता. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. नांदेड जिल्ह्यात १९७२ पेक्षाही विदारक चित्र निर्माण झाले होते. यावर्षी केवळ २० टक्केच पाऊस झाला. गेल्या काही वर्षांतील हा पावसाचा नीचांक आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः चिंताग्रस्त झाला होता.
शुक्रवारपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत समाधानकारक पाऊस झाला. या पावसाळ्यातील सर्वदूर पसरणारा हा पहिलाच पाऊस म्हणावा लागेल. हा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांना तात्पुरते समाधान मिळाले आहे. आजमितीला जिल्ह्यात केवळ ९० टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्या पिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यात २४ तासांत झालेला तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये, कंसात एकूण पाऊस -
नांदेड - ३२ ( २१२ . १५ )
मुदखेड - २० . ६७ ( २६९ . ३४ )
अर्धापूर - २० . ३३ ( २१४ . ३१ )
भोकर - ३५ . ५ ( २३० . ७० )
उमरी - १७ . ३३ ( २४० . ११ )
कंधार - २२ . ६७ ( २०५ . ५६ )
लोहा - २५ . ५० ( १७८ . ३७ )
किनवट - ३० . २९ ( २३९ . ५३ )
माहूर - ४ ( २५७ . ०९ )
हदगाव - ४२ . ४३ ( २०२ . ५६ )
हिमायतनगर - ६५ ( २०९ . ३५ )
देगलूर - ३ ( १३९ . १५ )
बिलोली - २२ . ८० ( २७७ . ४० )
धर्माबाद - २१ ( १८३ . ३२ )
नायगाव - २० ( २४१ . ८० )
मुखेड - ७ . २९ ( १९६ . १३ )
शनिवार अखेर पावसाची सरासरी २१८ . ५५ ( चालू वर्षातील एकूण पाऊस - ३४९६ . ८१ ) मिलीमीटर आहे.