नांदेड - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा चांगलाच कस लागला. नागरिकांसह कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना काँग्रेस नेत्यांना करावा लागला. त्यातच जिल्ह्यातील संस्थेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा तोंडी ठरल्याप्रमाणे कार्यकाळ संपुष्टात आला. त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या राजीनाम्याच्या सत्रानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात, की पुन्हा नाराजीचा सूर कायम राहतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. जिल्ह्यात काँग्रेसची मजबूत पकड असतानाही निवडणूक नेहमीच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत काँग्रेसचा चांगलाच कस लागला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण निवडणूक रिंगणात असतानाही कार्यकर्त्यांनी अंग झटकून काम केले नाही. हे नेमके कशामुळे घडले, याचे आत्मपरिक्षण करण्यास काँग्रेसने सुरुवात केली. त्यानुसार अनेक फेरबदल करण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला आहे. याची सुरुवात नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीपासून झाली.
पक्षश्रेष्ठींनी सभापती बी. आर. कदम यांना राजिनामा देण्यासाठी आदेशित केल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार त्यांनी निवडणूक संपताच आपला राजिनामा देऊन टाकला. त्यांनतर राष्ट्रवादी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिनकर दहिफळे यांचाही एक वर्षाचा कार्यकाळ संपला होता. त्यांनीही मंगळवारी आपला राजिनामा सादर केला. त्यासोबतच गुरुवारी सर्वसाधारण सभेत महापौर शीला भवरे यांनी आपला राजिनामा सुपूर्द केला.
शुक्रवारी मतमोजणी असून त्याअगोदरच जिल्ह्यात खांदेपालट सुरू असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. मुरब्बी राजकारणी असणारे खासदार अशोक चव्हाण हे व्यूहरचना करत आहेत. कोणत्या ठिकाणी कोणता पदाधिकारी नेमायचा हा अंतिम निर्णय त्यांचाच राहणार आहे.