नांदेड: मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी आज रविवारी सकाळी पार पडली. सर्वच्या सर्व १८ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला. काँग्रेसला १२, राष्ट्रवादीला ३, ठाकरे गटाला २ तर १ जागा अपक्षाला मिळाली आहे. नवनिर्वाचित अपक्ष सदस्याचेही 'मविआ'ला समर्थन लाभले. निकालात भाजप-शिंदे गटाचा सुपडा साफ झाला असून त्यांना खातेही उघडता आले नाही.
मतदारांचा 'मविआ'ला कौल: भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक ठरली. नांदेड कृउबा समितीच्या निवडणुकीत मविआच्या दिग्गजांनी एकवटून प्रचार केला. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे प्रत्यक्ष निवडणूक मैदानात उतरले होते तर शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती; पण मतदारांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवत मविआच्या बाजूने कौल दिला.
अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया: कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल राज्याला दिशा देणारा आहे. मतदारांनी केलेल्या मतदानाबद्दल अशोक चव्हाणांनी मतदारांचे आभार मानत ही 'मविआ'च्या काळातील केलेल्या कामाची पोचपावती असल्याचे सांगितले. लोकांचा प्रचंड विश्वास महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर आहे. देशात राज्यात ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे ते लोकांना पसंत नाही. 'मविआ'च्या काळात विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आणि लोकांना सोबत घेत कामे केली. नांदेड कृउबा समितीने मागील पाच वर्षांत लोकांची सर्वाधिक कामे केली. त्यामुळे लोकांनी आघाडीवर विश्वास दाखवला. पराभवामुळे विरोधक भूमिगत झाल्याचे मतही चव्हाणांनी मांडले.
मतदारांची कॉंग्रेसला पसंती: हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसला संपूर्ण 18 जागांवर विजय मिळाला. तर भोकरमध्ये काँग्रेसला 13, राष्ट्रवादीला 2 आणि भाजपला 3 जागा मिळाल्या. कुंटुर कृउबा समितीत भाजपला 9 तर काँग्रेस 9 जागांवर समाधान मानावे लागले. आमदार बालाजी कल्याणकर यांचे नेतृत्व मतदारांनी नाकारले असून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील निवडणूक प्रचारात सहभागी झाले होते; पण मतदारांनी आमदार कल्याणकर यांच्याबद्दल रोष व्यक्त करत महाविकास आघाडीला पूर्णतः निवडून दिले आहे. आमदार बालाजी कल्याणकर शिंदे गटात गेल्यानंतर सर्वाधिक विकास कामे आपणच केल्याचा दावा ते करत होते; पण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांना साधे खातेही उघडता आले नाही.