नांदेड - प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून राष्ट्रवादीची उमेदवारी नको म्हणणाऱ्याला भाजपने त्यांचा राजकीय पूर्व इतिहास न तपासता पावन करून घेतले. इतर चांगल्या इच्छुकांना डावलून भोकरमध्ये उमेदवारी लादली, पण या मतदारसंघातील मतदार सुज्ञ असून ते भाजपच्या या निष्क्रिय आणि थकलेल्या उमेदवारालाच विश्रांती देतील, असे रोखठोक उत्तर काँग्रेस नेते व भोकरमधील उमेदवार अशोक चव्हाण यांनी भाजप कार्याध्यक्षांच्या वक्तव्यावर दिले.
भाजप कार्याध्यक्ष जे. पी नड्डा यांनी गुरुवारी-मुदखेड येथे झालेल्या सभेत काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांच्यावर व्यक्तीगत पातळीवर टीका केली होती. गोरठेकरांची त्यांनी सच्चा व इमानदार अशी भलावण करून त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा अशोक चव्हाण यांनी खरपूस समाचार घेतला.
हेही वाचा - 'गुजरात्यांनी आंदोलन केले की नेतेपद, आम्ही केली की खटले'
नायगाव मतदारसंघातील मतदारांनी ज्या उमेदवाराला सलग दोन निवडणुकांत नाकारत घरी बसविले, त्यांना भाजपने आता भोकरमध्ये उमेदवारी दिल्यानंतर तुमच्या पक्षातील स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची काय भावना झाली आहे, ते जाणून न घेताच नड्डा यांनी वक्तव्य केले असले तरी, भोकरची जनता कोण कामाचा आणि कोण बिनकामाचा हे ओळखून आहे. त्यामुळे आराम करण्याची वेळ भाजप उमेदवारावरच येणार असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी दीर्घकाळ भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांना व मला मुख्यमंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली. त्यातून या मतदारसंघाची काँग्रेसने बांधणी केली. भोकर मतदारसंघातील विविध प्रश्न व विकासाच्या योजना मार्गी लावल्या, याची मतदारांना जाणीव असल्यामुळेच लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने आपल्याला आघाडी दिली होती. आताच्या निवडणुकीतही मतदार हीच परंपरा कायम राखतील, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - एमआयएम आणि 'वंचित'च्या काडीमोडास इम्तियाज जलील कारणीभूत - प्रकाश आंबेडकर
भाजप कार्याध्यक्षांनी मराठवाड्याच्या, नांदेड जिल्ह्याच्या विषयांमध्ये हात न घालता आपल्या भाषणात आर्टिकल ३७० वर भर दिला. त्यांच्या पक्षाच्या नव्या खासदाराची त्यांनी प्रशंसा केली. पण संसदेत आर्टिकल ३७० रद्द करण्यासंबंधीचे विधेयक मांडले जात असताना तुमचा हा खासदार कोठे होता, याचा नड्डा यांनी शोध घ्यावा, असा सल्ला चव्हाण यांनी दिला.