हिंगोली - टीक-टॉकवर प्रसिद्ध होण्यासाठी लोक वाटेल ते करत आहेत. अशातच औंढा नागनाथ तालुक्यातील आसोलातर्फे लाख येथील एका युवकाने टीक-टॉकवर वादग्रस्त व्हिडिओ तयार केल्याने विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याप्रकरणी एका युवकाच्या फिर्यादीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीने एका गीताचे जुने व्हिडिओ एडिट केले अन् त्यामध्ये वादग्रस्त भाषा वापरली. हा व्हिडिओ फिर्यादीच्या भावाने पहिल्यानंतर फिर्यादीस दाखवला. यानंतर त्यांनी आयडी व मोबाईलची खात्री करून कुरुंदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सध्या अनेकांना टीक-टॉकचे वेड लागले आहे. या वेडेपणामध्ये आपण नेमके काय करतोय याचेदेखील त्यांना भान राहत नाही. पोलीस उपाधीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी सुनील गोपनीवार हे आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेने जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे.