नांदेड: ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधिक्षक, अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व जिल्हा प्रतिनिधी, एलआयसी विमा कंपनी यांची गुरुवारी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे. सद्यःस्थितीत ७८.४८ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. प्रकरणी पीक नुकसानीचे सर्व पंचनामे प्रत्यक्ष ठिकाणी जावून शुक्रवार पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी डोंगरे यांनी ऑक्टोबर मधील पावसामुळे शेती पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीबाबत शासनास सादर करावयाच्या विवरणपत्राची माहिती या आढावा बैठकीत दिली. विवरणपत्रातील माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देशही दिलेत. ऑक्टोबर २०१९ मधील शेतीपिकांसाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीसह संयुक्त समितीने सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. तथापी, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनामा करतेवेळी उपस्थीत नसल्यास शासकीय यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरण्यात येतील, असे कृषी आयुक्त, पुणे यांनी कळवले आहे.
नुकसानीच्या पंचनाम्या दरम्यान काढलेले फोटो शेतीपिकांच्या नुकसानीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. पीक नुकसानीचे जिओ टॅग्ड फोटो नसल्यास पीक विमा कंपनीकडून विम्याचा दावा खारीज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरचे पंचनामे हे विहीत नमुन्यात करणे आवश्यक असून त्यासोबत प्रत्येक शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे जिओ टॅग्ड फोटो काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृषी आयुक्त यांच्याकडून प्राप्त विहीत पंचनाम्याच्या नमुन्यात शेतकऱ्यांचे नाव, सही इ. बाबी नमूद असलेला पंचनामा आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामस्तरावरील स्वयंसेवी संघटना, युवकांना पंचनाम्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकरी अरूण डोंगरे यांनी केले आहे.