नांदेड - येथील बिलोली तालुक्यातील माचनूर येथे एका तरुणाला कोब्रा जातीच्या सापाचा दंश झाला. मात्र त्यानंतरही त्याने तो साप पकडून तब्बल दहा किमीचे अंतर पार करत रुग्णालय गाठल्याची घटना घडली. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्या तरूणाला नांदेडला उपचाराकरता हलविण्यात आले. बिलोली तालुक्यातील माचनुर रेतीघाटांवर कामावर असलेल्या बिलोली येथील बालाजी विठ्ठल पांचाळ (२५) असे त्या सर्पदंश झालेल्या तरूणाचे नाव आहे.
पाठलाग करून पकडला कोब्रा -
हा तरुण दोन मित्रांसह वाळूवर बसलेला होता. त्याचवेळी बालाजीला कोब्रा जातीच्या सापाने चावा घेतला. साप चावा घेवून दुसऱ्या दिशेने पळत असताना बालाजी याने त्याच अवस्थेत त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. बालाजीच्या हातात जीवंत साप पाहून सोबतच्या दोन मित्रांची बोबडी वळाली होती. परंतु बालाजीने मित्राला आपली दुचाकी घेवून रुग्णालयात चालण्यास सांगितले.
त्यानंतर बालाजीचा मित्र दुचाकी चालवित असताना तो स्वत: मात्र पाठिमागे जीवंत साप घेवून बसला होता. माचनूर ते बिलोली रुग्णालय दहा किलोमीटर अंतर आहे. हे अंतर बालाजीने जीवंत सापासह पूर्ण केले. व रुग्णालयात पोहोचल्यावर तो बेशुद्ध झाल्यावर त्याने हा हातातील साप सोडला.
त्यानंतर या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी सापाला ठेचून मारले. बालाजीवर रुग्णालयात वैद्यकिय अधिक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, प्रकृती ढासळत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे़.