नांदेड - जिल्ह्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सरपंचांशी संवाद साधला. तसेच दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने सतर्क राहून कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.
दुष्काळग्रस्त तालुक्यातील सरपंचांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद साधला. या संवाद सेतूच्या माध्यमातून सुमारे २० हून अधिक सरपंचाच्या तक्रारी आणि सूचना ऐकून घेतल्या. सूचनांची नोंद स्थानिक प्रशासन घेत असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
टँकर आणि चारा छावणीच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये मागणीनुसार टँकर सुरू करावेत. तसेच जेथे वाढीव टँकरची मागणी आहे. त्याठिकाणी पाहणी करून तत्काळ कार्यवाही करावी. आवश्यक तेथे चारा छावणी सुरू करा. सन २०१८ च्या लोकसंख्येनुसार जनावरांची संख्या लक्षात घेऊन टँकर सुरू करण्यात यावेत. टँकरच्या फेऱ्या नियमित होतील, याकडे गट विकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. दुरुस्तीअभावी बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात योग्य ती पावले प्रशासनाने उचलावीत. पाणी पुरवठा योजनांची अपूर्ण कामे तातडीने मार्गी लावावीत.
नांदेड जिल्ह्यात रोहयोतून सध्या ९४२ कामे सुरू असून १९ हजार ५८४ कामे शेल्फवर आहेत. त्यामुळे आवश्यक तेथे रोहयोची कामे सुरू करावीत. सरपंचांनी केलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यावर कार्यवाही करावी. यासाठी दुष्काळाशी संबंधित तक्रारी व सूचनांसाठी सरपंचांना व्हॉटसअप क्रमांक देण्यात आला आहे. त्यावरील तक्रारीचीही दखल घेऊन जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेच्या यंत्रणांनी संवेदनशीलपणे कामे करावीत.
दरम्यान नांदेड जिल्ह्यासाठी केलेल्या उपाययोजना -
नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर व उमरी या ३ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. ३ तालुक्यातील गावांची संख्या ३०६ इतकी आहे. दुष्काळ घोषित केलेल्या मुखेड तालुक्यात ५१ टँकर, देगलूर २ टँकर आणि उमरी तालुक्यामध्ये १ टँकर सुरू आहे.