नांदेड – टाळेबंदीच्या काळात कोणत्याही कारणाशिवाय कमी केलेल्या सफाई कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे, या मागणीसाठी कर्मचारी युनियनच्या वतीने आजपासून महानगरपालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले. आजच्या उपोषणात एकूण सात कामगार उपोषणाला बसले आहेत.
उपोषणस्थळी कामगार नेते अॅड. कॉ.प्रदीप नागापूरकर उपस्थित राहिले. ते यावेळी म्हणाले की, एकीकडे देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री बेरोजगार कामगारांना काम मिळवून देण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना आखत आहेत. तर दुसरीकडे नांदेडमध्ये मनपा प्रशासनाकडून असलेल्या कामगारांचा रोजगार हिरावून घेतला जात आहे. हा विरोधाभास असल्याचा आरोप त्यांनी केला.
जीवाची पर्वा न करता कामगार करतात काम-
कोरोना महामारीच्या संकटकाळात स्वतःच्या व कुटुबीयांच्या जिवाची पर्वा न करता शहर स्वच्छतेच्या कामात कंत्राटी कामगार स्वतःला झोकून देतात. मात्र, मनपा प्रशासन व कंत्राटदारांनी अचानकपणे कुठलेही कारण न देता बेकायदेशीरपणे एप्रिलमध्ये कामगारांना कामावरून कमी केले. याबाबत कंत्राटदार व मनपा प्रशासनाशी कामगारांनी वारंवार चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कचऱ्याचे वजन कमी येत असल्याने कामगार परवडत नसल्याचे कारण सांगण्यात आले. कोरोना महामारीमुळे शहरातील अनेक दुकाने बंद राहिली आहेत.
जुन्या कामगारांना घरचा रस्ता, नवीन कामगारांची भरती-
प्रत्यक्षात मात्र पंधरा-वीस वर्षे काम करणाऱ्या कामगारांना कामावरून कमी केलो जाणार असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे नवीन भरती घेतली जात असल्याची तक्रार कामगारांनी केली आहे. याबाबत मनपा आयुक्त, कंत्राटदार व स्वच्छता विभागाशी पत्रव्यवहार करूनही कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले.
त्यानंतर मराठवाडा नगरपालिका, महानगरपालिका कामगार, कर्मचारी युनियनच्यावतीने महापालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. या उपोषणात अंबादास सुभाष कोल्हे, सुरेश जाधव, सुजाता धोंडिबा गजभारे, वाघोजी चांदोजी व आशाबाई गजभारे आदी कामगार बसले होते.