नांदेड - नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी उशिरा फेटाळला आहे. अपक्ष उमेदवार रवींद्र थोरात आणि शेख अफजलोद्दीन अजिमोद्दीन उर्फ शेख सर (बहुजन महापार्टी) यांनी घेतलेल्या आक्षेपांवर बुधवारी प्रदीर्घ युक्तीवाद झाला. त्यानंतर रात्री उशिरा डोंगरे यांनी हा निर्णय दिला.
खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रतिज्ञापत्रात २०१४ साली दाखल केलेल्या शपथपत्रात १ कोटी ५६ लाख ५७ हजार, आणि ८६ लाख रुपयांचे वेगवेगळे फंड दाखविले होते. मात्र, यावेळी त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. याबद्दल उमेदवारांनी आक्षेप घेतला. तसेच, भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी चव्हाण कुटुंबीयांच्या गॅस एजन्सीचे उत्पन्न आपल्या शपथपत्रात दाखविले नसल्याबद्दल आक्षेप घेतला. वेगवेगळ्या फंडांच्या माध्यमातून २०१४ साली दाखविलेली रक्कम या वर्षीच्या शपथपत्रात गायब करण्यात आली आहे. नेमके या फंडाचे काय झाले, त्याचे विवरण अशोक चव्हाण यांनी दिले नसल्याचा आक्षेपही नोंदविण्यात आला होता.
बहुजन महापार्टीचे उमेदवार शेख अफलोद्दीन अजिमोद्दीन यांनी २०१४ आणि २०१९ च्या शपथपत्रात तफावत असल्याने उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदविला. त्यांच्या वकिलाने बुधवार सायंकाळपर्यंत वेगवेगळे पुरावे आणि आक्षेप दाखल केले गेले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी ते सर्व आक्षेप फेटाळले आहेत.