नांदेड - खासदार हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'माझं शहर, देखणं शहर' या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला, नांदेडच्या दक्षिण भागातील सिडको-हडको येथे आज गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली. या उपक्रमांतर्गत मागील दोन वर्षांपासून, शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दर्शनी भागांवर वेगवेगळे संदेश लिहून त्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील तरोडा नाका, राज कॉर्नर, वर्कशॉप या भागात रंगरंगोटी करून सामाजिक संदेश रेखाटल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये, सिडको-हडको भागातील इंदिरा गांधी विद्यालय, शिवाजी विद्यालय, अण्णाभाऊ साठे पुतळा, पाण्याची टाकी, जिजाऊ सृष्टी, नांदेड-वाघाळा महानगरपालिका झोन कार्यालय यासह इतर दर्शनी भागातील भिंतींवर चित्रे, घोषवाक्ये, शैक्षणिक उपक्रम, अंधश्रद्धा निर्मुलन व इतर समाजोपयोगी संदेश या बाबींचा समावेश असेल. सिडको येथील हरहुन्नरी जेष्ठ चित्रकार श्रीरंग खानजोडे यांच्या सुंदर कलाकृतींमधून सिडको-हडको भागाचे रुपडे पालटणार आहे.
याप्रसंगी, सिडको शिवसेना शहर प्रमुख निवृत्ती जिंकालवाड, दक्षिण उपशहरप्रमुख नंदू वैद्य आदींसह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.