नांदेड - राज्य शासनाने पहिल्यांदा मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करावे. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिल्लीला येऊन सर्वांना भेटावे वाटले. पण त्यांना मराठा समाजाची बाजू मांडणाऱ्या माझ्या सारख्या खासदाराना भेटायला वेळ मिळाला नाही. केवळ मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम राज्य शासनाकडून केले जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहिले. पण नांदेडचे पालकमंत्री यांना समाजाचे प्रश्न समजून घ्यायला वेळ नाही. ते त्यांच्या वागण्यात दिसत नाही. आज नांदेडला समाजासमोर येऊन त्यांनी आपली भूमिका मांडायला हवी होती. मात्र इ-मेलद्वारे मुख्यमंत्री यांनी मला पाठवलेल्या पत्राचा मी निषेध करतो. वेळीच समाजाच्या भावना समजून घ्या, अन्यथा मुंबई-दिल्लीवर रान पेटवण्याची वेळ आणू नका, असे प्रतिपादन करत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य व केंद्रसरकारवर बरसले. ते नांदेड येथे मराठा क्रांती मोर्च्या वतीने आयोजित मूक मोर्चात ते बोलत होते.
'...तर जीआर काय कामाचा?'
मुख्यमंत्र्यांनी जे पत्र आम्हाला पाठवले. त्या पत्रात प्रचंड तफावत आहे. १४ जुलैचा जो जीआर आहे, त्या जीआरनुसार २०१४ ते कोरोना महामारीपर्यंत ज्या मराठा उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या त्यांना रुजू करून घ्या, असे नमूद करण्यात आले असले तरी जात प्रमाणपत्राची पडताळणी न झाल्याने मराठा समाजातील उमेदवारांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. किती दिवस चालणार? जर आरक्षण रद्द केले तर हा जीआर काय कामाचा,असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अशोकराव चव्हाण यांनी राज्यात मराठा समाजासाठी २३ वसतीगृह १५ ऑगस्ट पूर्वी सुरू करू, अशी ग्वाही दिली होती. आता अशोकराव चव्हाण यांनीच सांगावे की राज्यात किती वसतीगृह सुरू केलेत. जी वसतिगृह सुरू झाली ती वसतिगृह मागच्या युती सरकारच्या काळातील आहेत. या सरकारच्या काळात केवळ ठाण्यामध्ये एक वसतीगृह सुरू करण्यात आले, ते वसतीगृह एकनाथ शिंदे यांनी स्वतः सुरू केले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे आम्ही स्वागत करतो. परंतु अशोकराव चव्हाण यांनी समाजाची दिशाभूल थांबवावी, असे म्हणत चव्हाण यांच्यावर संभाजीराजे यांनी कडाडून टीका केली.
'केंद्र व राज्यसरकारची टोलवाटोलवी'
मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमधील सुरू असलेली टोलवाटोलवीही मराठा समाजाची दिशाभूल करणारी आहे. राज्य आणि केंद्र सरकारने आता टोलवाटोलवी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी निर्णायक भूमिका घ्यावी, अन्यथा आम्हाला रान पेटविण्याची वेळ आणू नका, असा इशारा छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला आहे.
हेही वाचा - राज्यातील कुचकामी सरकार कसे लवकर जाईल यासाठी कामाला लागा; नारायण राणेंचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन