नांदेड - जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत असलेला संसर्ग लक्षात घेवून प्रशासनाने 12 जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाचे माजी गृहमंत्री दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती घरी राहूचन साजरी करून, प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन चव्हाण कुटुंबीयांच्यावतीने करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे आपण धनेगाव येथील त्यांच्या समाधीस्थळी न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
येत्या 14 जुलैला डॉ. शंकराव चव्हाण यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात दरवर्षी अनेक उपक्रम व कार्यक्रम होत असतात. विशेषतः हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे महाराष्ट्र शासन व काँग्रेसच्यावतीने भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, कोरोनाचा वाढलेला संसर्ग ही बाब सर्वांसाठी चिंतेची ठरली आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने 12 जुलैच्या मध्यरात्रीपासून 20 जुलैपर्यंत नांदेड जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाचा हा निर्णय योग्य असून, या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपण सर्वांनी घरी राहूनच जयंती साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणीही धनेगाव येथील समाधीस्थळी किंवा शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयापुढील पुतळा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार अमिता चव्हाण, श्रीजया चव्हाण, सुजया चव्हाण यांनी केले आहे.