नांदेड - शहरात कोरोना परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक नांदेडमध्ये दाखल झाले आहे. केंद्राच्या दोन सदस्यीय पथकाने आज नांदेडमध्ये पाहणी केली. शहरातील कोविड हॉस्पिटल, क्वारंटाइन सेंटरमध्ये जाऊन पथकाने पाहणी केली.
टेस्ट, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटचे निरीक्षण -
नांदेडचे प्रशासन कशा पद्धतीने कामकाज करत आहे, याची माहिती देखील पथकाने घेतली. टेस्ट, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट कशी केली जाते याच निरीक्षण या पथकाने केले.
पॉझिटिव्ह रुग्णांच्याही जाणून घेतल्या तक्रारी -
लसीकरणाचा आढावादेखील या पथकाने घेतला. कोविड सेंटरमध्ये जाऊन पॉझिटिव्ह रुग्णांच्या तक्रारी पथकाने ऐकून घेतल्या. नांदेडच्या कोविडस्थितीचा अहवाल हे पथक केंद्राला देणार आहे. नांदेडमध्ये प्रशसनाने कशापद्धतीने काम केले. चांगले किंवा वाईट, काही उणिवा आहेत का याचा अहवाल केंद्राच्या आरोग्य मंत्रालय आणि आरोग्य विभागाला दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
सध्या नांदेड जिल्हा आहे कोरोनाचा हॉटस्पॉट -
नांदेड जिल्हा सध्या कोरोनाचा हॉट स्पॉट झाला आहे. दररोज एक हजारांहून अधिक रुग्ण येथे आढळत आहेत. मागील काही दिवसापासून मृतांचा आकडादेखील वाढला आहे. गेल्या 24 तासात 1255 रुग्ण तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या नांदेडमध्ये अॅक्टिव्ह रुगणाची संख्या 10783 इतकी आहे. विशेष म्हणजे 25 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत नांदेडमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता. 11 दिवसाच्या लॉकडाऊनच्या काळातदेखील रुग्णसंख्या वाढली.