नांदेड- माहूर शेत जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाला व त्याच्या पत्नीला विष पाजल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान बंडू राठोड व त्याची पत्नी यशोदाबाई बंडू राठोड यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत पती-पत्नीच्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून नऊ जणांविरुध्द सिंदखेड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहूर तालुक्यातील जुनापाणी येथील बंडू राठोड व त्याची पत्नी यशोदाबाई बंडू राठोड हे मुलीच्या शिक्षणासाठी काही वर्षा पूर्वी नांदेडला राहायला गेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने ते आपल्या गावी परतले. या दरम्यान बंडू राठोड यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती व त्यांनी स्वतः वाई बाजार येथे घेतली चार एकर शेतीच्या वहिवाटी वरून भावकीत वाद निर्माण झाले. समाजातील पंचांनी यात मध्यस्थी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
१० जून रोजी पुन्हा वाद झाल्याने बंडू राठोड व त्याची पत्नी यशोदाबाई यांना खंडू मिसू राठोड,राजेश मिसु राठोड,बेबीताई खंडू राठोड, प्रियंका राजेश राठोड, कांता बाई मीसू राठोड,संजय मिसू राठोड,निखिल खंडू राठोड,निकिता खंडू राठोड,पांडू मिसू राठोड रा. जनापाणी यांनी मारहाण केली.यानंतर यशोदाबाई हिला जबरदस्ती विष पाजले आणि बंडू राठोड यालाही मारहाण करून विष पाजले.
बंडू राठोड यांनी या घटनेनंतर पत्नी यशोदाला दूचाकीवरुन माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, प्रकृती खालावल्याने यशोदा व बंडू या दोघांना यवतमाळ हलविण्यात आले. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना १६ जून रोजी दोघांचाही मृत्यू झाला.
या घटनेची तक्रार मृतांच्या अल्पवयीन मुलीने सिंदखेड पोलिसात दिली.यावरुन मंगळवारी रात्री उशिरा ९ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर करीत आहेत.