नांदेड - बारड व पेठवडज गटातील जिल्हा परिषद सदस्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून जागा रिक्त होत्या. तसेच बोधडी येथील सदस्याचे निधन झाल्याने जागा रिक्त झाली होती. दरम्यान, या तीनही जागांवर पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. यासोबत पंचायत समितीच्या तीन रिक्त जागांच्या निवणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे.
या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आवाज घुमणार आहे.
२६ फेब्रुवारीपर्यंत दाखल करता येतील हरकती व सूचना-
राज्यातील विविध १९ जिल्हा परिषद आणि २७ पंचायत समित्यांमधील ६० रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २६ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.
जिल्हा परिषदेच्या तीन जगासाठी पोटनिवडणुक-
राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात बारड, पेठवडज व बोधडी अशा तीन जिल्हा परिषद गटातील रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. मुदखेड तालुक्यातील बारड गटातून निवडून आलेल्या सविता वारकड तसेच कंधार तालुक्यातील पेठवडज गटातून विजयी झालेल्या शीलाताई उलगुलवाड या दोन महिला सदस्यांचे जात प्रताणपत्र अवैध ठरले आहे. या दोन्ही गटातील सदस्यांना पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. याशिवाय किनवट तालुक्यातील बोधडी जिल्हा परिषद गटातील सुनंदा दहिफळे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे येथेही पोटनिवडणूक होत आहे.
जिल्हा परिषदेचा केवळ एक वर्षाचा कालावधी शिल्लक-
नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरशीच्या तसेच रंगतदार लढती झाल्या. ग्रामीण भागात गावचे कारभारी होण्यासाठी मोठी स्पर्धा होती. त्यामुळे निवडणुकीच्या काळात सर्वत्र उत्साह दिसून आला. त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. येत्या वर्षभरात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यातच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या सदस्यांना जेमतेम वर्षभराचा कालावधी मिळणार आहे.
नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस-शिवेसेनेची सत्ता-
जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस व शिवसेनेची सत्ता आहे. येणाऱ्या काळात देखील काँग्रेसची सत्ता अबाधित राहू शकते. परंतु, रिक्त जागांवर निवडून येणाऱ्या सदस्यांना खुपच कमी काळ मिळणार आहे. तरी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य म्हणून नोंद होणार आहे. त्यामुळे अनेकजण येथे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याने रिक्त जागांसाठी सुद्धा चुरस असल्याचे दिसून येते.
पंचायत समिती गणाचीही निवडणूक होणार-
दरम्यान, अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, नांदेड तालुक्यातील वाडी बुद्रुक व मुदखेड तालुक्यातील मुगट या तीन पंचायत समिती गणातील रिक्त जागांसाठी देखील निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
हेही वाचा- उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, 150 जण वाहून गेल्याची भीती, १० जणांचा मृत्यू