नांदेड - जिल्ह्यातील चिंचोर्डी (ता.हिमायतनगर) येथील शेतकरी सरपण आणण्यासाठी शुक्रवारी (दि.२९) सकाळी सात वाजताच्या दरम्यान जंगलात गेला होता. त्यांचा अज्ञात आरोपींने धारधार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे. पांडूरंग मारोती वाघमारे (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मोबाईलमुळे मिळाला मृतदेह -
हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी येथील शेतकरी पांडूरंग मारोती वाघमारे हे आपल्या शेतापासून जवळपास तीन कि. मी. असलेल्या कोल्हारी दरीत जंगल टेकडीवर जाळण्यासाठी सरपण आणण्याकरीता शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास गेले होते. दुपार झाली तरीही ते घरी आले नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली. घनदाट जंगल असल्याने त्यांचा शोध लागत नव्हता. अखेर शेतकरी पांडूरंग यांच्या जवळ मोबाईल असल्याने मोबाईलवर काॅल करून रिंगटोनच्या साह्याने त्यांच्यापर्यंत पोहचता आले. शेतकरी पांडूरंग यांच्यावर धारधार शस्त्राने वार केलेले आढळून आले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -
हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी घटनास्थळीची पाहणी करून मृतदेह हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. मृत पांडूरंग यांचा भाऊ शेषेराव मारोती वाघमारे यांच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - धक्कादायक... वारंगणांच्या वस्तीत सापडले दोन गुप्त भुयार, अल्पवयीन मुलींना लपवण्यासाठी व्हायचा उपयोग