नांदेड - लोहा तालुक्यातील सोनखेड येथील भुमिपूत्र सीमा सुरक्षा दलाचे जवान सतोष गंगाधरराव सिदापुरे हे राजस्थानातील जोधपूर येथे जांबाज किंग बुलेट चालविताना अपघात होवून त्यांना वीरमरण आले.
सोनखेडचे भुमिपुत्र संतोष सिदापुरे हे २१ जुन २०१० मध्ये सीमा सुरक्षा दल ( बीएसएफ ) मध्ये सामील झाले होते. त्यांची नियुक्ती गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये झाल्यानंतर ते ट्रेनिंगसाठी टेकनपूर येथे गेले होते. त्यानंतर बंगाल, काश्मीर, बारामुल्ला, जम्मूमध्ये सांबा सेक्टर व दिल्ली येथे त्यांनी ११ वर्ष ४ महिने सेवा बजाविली. सद्यस्थितीत ते संपूर्ण भारत भ्रमण करून राजस्थानातील जोधपूर येथे जांबाज शिपाई या बुलेट स्टंटमध्ये सामील होते. याच सरावादरम्यान २ ऑक्टोंबर रोजी त्यांचा अपघात झाल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचे निधन झाल्याचे घोषित करण्यात आले.
हे ही वाचा -शाहरूख खानचा मुलगा असेल किंवा कोणीही, कठोर कारवाई झाली पाहिजे - रामदास आठवले
दरम्यान ४ ऑक्टोंबर रोजी त्यांचे पार्थिव मुळगाव सोनखेड येथे आणण्यात येणार असून त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शेतात विधीवत व सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांसह सोनखेड गावावर व परिसरात हळहळ व्यक्त होत असून संतोष सिदापुरे यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.
शहीद संतोष सिद्धापुरे यांना पालकमंत्र्यांकडून श्रद्धांजली -
सीमा सुरक्षा दलाचे वीरजवान व नांदेड जिल्ह्याचे भूमिपूत्र संतोष गंगाधरराव सिद्धापुरे यांचे जोधपूर, राजस्थान येथे कर्तव्यावर असताना अपघाती निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना असे ट्विट करत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे.