नांदेड - जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन पिकाच्या बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील सर्वदूर भागातून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणांच्या तक्रारी येताय आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात शेतशिवारात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवत नसल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवण क्षमता नसणाऱ्या सोयाबीन बियाणांच्या शेतात दुबार पेरणीसाठी नांगर फिरवण्यास सुरवात केली आहे.
हेही वाचा... आदिवासी विकास महामंडळाचा बेजबाबदारपणा.. गोदामांअभावी शेकडो क्विंटल धान्य पावसाने सडले
नांदेड जिल्ह्यात 21 जूनपर्यंत सरासरी 120 मिलिमीटर पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या 13 टक्के इतका हा पाऊस आहे. जिल्ह्यात सर्वत्रच हा पेरणीलायक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी विविध जातींची बियाणे विकत आणून पेरणी केली. मात्र, पेरलेले बियाणे उगवलेच नाही. तर काही ठिकाणी बियाणे अल्प क्षमतेने जमिनीवर उगल्याचे दिसत आहे. त्यामुळे दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांना आता पर्याय राहिलेला नाही.
अगोदरच लॉकडाऊनमुळे शेतमालाचे भाव पडले आहेत. त्यातच आता पेरलेले धान्य न उगवल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... पेरलेले बियाणे उगवत नसेल तर, संबधीत कंपनीवर कारवाई करू - कृषीमंत्री दादा भुसे
दुबार पेरणीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा मोफत पुरवठा करावा. तसेच अशा बोगस बियाणांची विक्री करणारे दोषी विक्रेत आणि बियाणे निर्माण करणारी कंपनी, यांच्यावर शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी नांदेडचे खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी केली आहे.