नांदेड - निवडणुकीच्या काळात घरोघरी जावून मतदारांची माहिती घेणारे 'बिएलओ' आता स्वस्त धान्य दुकानात बसून लाभार्थ्यांना नियमानुसार अन्नधान्य दिले जाते की नाही, यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्याची उपासमार न होता त्यांना त्यांचे हक्काचे अन्नधान्य मिळावे, यासाठी प्रशासनकडून प्रयत्न केले जात असून अन्नधान्य वाटपात कुठलीही गडबड होवू नये, यासाठी प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात 'बीएलओ' ची नेमणूक करण्यात आली आहे.
यामुळे लाभार्थ्यांचा अंगठा घेवूनही माल न देणे, कमी अन्नधान्य देणे अशा प्रकारांना आळा बसणार आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी शासनाला 'लॉकडाऊन' सारखा कठोर निर्णय घ्यावा लागल्याने त्याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणारे हजारों कष्टकरी, कमगार व मजूर यांना बसला आहे. व्यवसाय, उद्योगधंदे बंद झाल्याने गरीव व सर्वसामान्य लोकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे अशा लोकांची अन्नधान्यावाचून उपासमार होवू नये, यासाठी त्यांना होणारा स्वस्ता धान्याचा पुरवठा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे नियोजन केले जात आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना वाटप होणारे अन्नधान्य पूर्णपणे त्यांना मिळयला हवे, असे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी त्यांनी 'बिएलओ'ची मदत घेतली आहे. निवडणुकीच्या काळात प्रशासन व मतदारांमधील 'बीएलओ' हा महत्वाचा घटक असतो. घरोघरी जाऊन तो मतदारांची माहिती गोळा करण्याचे काम करतो. हेच बीएलओ आता स्वस्त धान्य दकानांवर बसून अन्नधान्य वाटपावर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.
शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार अन्नधान्य वाटप केले जाते की नाही, त्यांच्याकडून जास्त रक्कम घेतली जाते का? या सर्व गोष्टींवर बीएलओचे नियंत्रण राहणार आहे. त्यांच्या उपस्थितीतच माल वाटप करावे, असे स्वस्त धान्य दुकानदारांना बजावण्यात आले आहे. त्याचबरोबर रोज सायंकाळी अन्नधान्य वाटपाचा अहवाल सादर करावा, असेही या दुकानदारांना सांगण्यात आले आहे. हे शक्य नसल्यास प्रत्येक शिधापत्रिकाधारकांचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढावा, अशी सूचनाही त्यांना करण्यात आली आहे.