नांदेड - यापुढे जबरदस्तीने वीज कनेक्शन तोडाल तर आमचे हात सुटतील आणि याचे परिणाम अधिकाऱ्यांना भोगावे लागतील, असा इशारा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. त्यांनी मंगळवारी नांदेड महावितरण कार्यालयाला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पूर्वसूचना न देता केला जातो वीजपुरवठा खंडित
थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरण विभागाने अजब फंडा वापरला आहे. पूर्वसूचना न देता वीजपुरवठा बंद करण्याची मोहीम या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. यामुळे जे शेतकरी नियमितपणे वीजबिल भारतात त्यांनादेखील या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे.
पिकांचे नुकसान
महावितरण विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. डीपीवरून वीजपुरवठा बंद केल्यामुळे शेतकाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे गहू आणि इतर पीके पाण्याअभावी जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
24 तासात केवळ आठ तास वीजपुरवठा
अनेक अडचणींवर मात करीत बळीराजा शेतावर राबत आहे. मात्र महावितरणकडून होणाऱ्या त्रासाला बळीराजाला मुकाट्याने सहन करावे लागत आहे. त्यात 24 तासांत शेतीसाठी केवळ आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. एकाच डीपीवर घेऊन क्षमतेपेक्षा जास्त कनेक्शन, तारतंत्रीमध्ये हेतूपुरस्सर कमी दाबाने विद्युत पुरवठा, दुरूस्तीसाठी अथवा निगराणीसाठी एकही लाइनमन किंवा हेल्पर हजर नसणे, डागडुजीसाठी फोन लावला असता प्रतिक्रिया न देणे यासारख्या समस्यांमुळे शेतकरी वैतागला आहे
भाजपाची आक्रमक भूमिका
महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारावर भाजपाने नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी आणि घरगुती वीज वापरासाठी देण्यात येणारी बिले ही अव्वाच्या सव्वा आहेत. नांदेडतील एका व्यापाऱ्याला 11 लाख रुपये बिल आले. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यापुढे महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जबरदस्ती शेतीचा वीज पुरवठा खंडित केल्यास, शेतकऱ्यासोबत भाजपाचे कार्यकर्तेदेखील विरोध करतील, याची पूर्ण जबाबदारी अधिकाऱ्यांची राहील, असा इशारा त्यांनी दिला.