नांदेड - कंधार येथील महावितरणच्या १३३ के.व्ही. केंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्ममध्ये अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाच्या गाडीने ही आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
कंधार शहरातील १३३ के.व्ही. सबस्टेशनमधील शहराला विद्युत पुरवठा करणाऱ्या पॉवर ट्रान्सफॉर्मरला सायंकाळच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. बघता बघता आगीने रोद्ररूप धारण केले. आगीची माहिती कंधार आणि लोहा पालिकेला काळविल्यानंतर अर्ध्या तासाने दोन्ही अग्निशामक दलाची वाहने एकमागे एक पोहचले. नंतर आग आटोक्यात आणली. त्यामुळे आजूबाजूचे इतर पॉवर ट्रान्सफॉर्मर जळण्याचा अनर्थ टळला.
जळालेली पॉवर ट्रान्सफॉर्मर पाच मेगा होल्टचा आहे.त्याची किंमत जवळपास २५ ते ३० लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. आगीच्या या घटनेमुळे शहरातील विद्युत पुरवठा ४ ते ५ तास खंडित झाला होता.
या विद्युत सबस्टेशनच्या आजूबाजूला वस्त्या आहेत. या आगीचे रौद्ररूप धारण केल्याने वस्तीतील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पॉवर ट्रान्सफॉर्मरला लागूनच दुसऱ्या एका ग्रामीण भागाला विद्युत पुरवठा करणारे पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. त्यावरील ही विद्युत तारा जळाल्यामुळे कंधार शहरासह वंजारवाडी, नवघरवाडी, इमामवाडी, पानभोसी, चिखलभोसी या भागाचाही विद्युत पुरवठा गुरुवारी रात्री चार ते पाच तास खंडित झाला आहे. या प्रकारची माहिती मिळताच नांदेड डिव्हिजनचे सहायक अभियंता निखिल धकाते यांच्या टीमने कंधार येथे जाऊन जळालेल्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी केली. त्यानंतर कंधार शहरासह ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.