नांदेड - बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी नांदेडात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमायतनगर तालुक्यातील पोटा या गावात हा प्रकार घडला. व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी न्यायालयाने १६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस
तालुक्यातील मौजे पोटा बु. येथील बस थांब्यावर एकाने दुकानदाराकडून साहित्य खरेदी केले. त्या बदल्यात दोनशे रुपयांची बनावट नोट दुकानदाराकडे दिली. मात्र, त्या व्यापाऱ्याला ती नोट बनावट असल्याचे लक्षात आले.
हेही वाचा - 'घोटाळेबाज प्रताप सरनाईकवर महाराष्ट्र सरकार कधी कारवाई करणार?'
दोनशेच्या २४ नोटा आढळल्या
परिसरातील नागरिकांनी आरोपीची विचारपूस केली, असता त्याच्याकडे दोनशेच्या २४ नोटा आढळल्या. या नोटा रस्त्याच्या कडेला पडलेल्या मिळाल्या, असे उत्तर आरोपीकडून मिळाले. आहे. येथील युवा नागरिकांनी त्यास हिमायतनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट नोटा चलनात आणणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
१६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
याप्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी आरोपीला येथील दिवाणी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला १६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांनी जंजिरा गडावरील निर्बंध उठवले, किल्ला पर्यटनास खुला