नांदेड - खूनाच्या गुन्ह्यात विरोधात साक्ष दिली म्हणून दोघांनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना शहरातील जयभिमनगर भागात शनिवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
चंद्रकांत गौत्तम जोंधळे ( वय २० ) याने सराईत गुन्हेगार असलेल्या निहाल पाईकराव विरोधात खूनाच्या गुन्ह्यात साक्ष दिली होती. याचा राग मनात धरुन पाईकराव याने शनिवारी रात्री चंद्रकांत जोंधळे याच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. तसेच त्याच्याजवळ असलेल्या चाकूने जोंधळेवर वार केले. डोक्यात, पायावर, मांडीवर आणि नाजूक भागावर वार झाल्याने जोंधळे जखमी झाला. जोंधळेवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निहाल पाईकराव व त्याचा मित्र सोनु गुंजकर (दोघे रा.जयभिमनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . शिवाजीनगर ठाण्याचे गुन्हे शोधपथक प्रमूख सहाय्यक पोलीस निरीक्षक करीम पठाण यांनी पळून जाण्याच्या बेतात असलेल्या या दोन्ही आरोपींना अटक केली. फौजदार श्रीदेवी पाटील यांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले. या प्रकरणाचा तपास फौजदार कांबळे हे करत आहेत.