नांदेड - पुण्याहून आलेल्या तीन जणांना शासकीय रुग्णालयात क्वारंटाईन होण्याबाबत सुचना देण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि सरपंचाला मारहाण केल्याची घटना घडली. नांदेडमधील धनेगाव येथे आज सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला.
धनेगाव येथील तीन तरुण पुण्याला वास्तव्याला होते. हे तीघे जण काही दिवसांपूर्वी गावाकडे येवून कुटुंबीयांसमवेत राहू लागले. याची माहिती आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. आरोग्य कर्मचारी गावातील तीन तरुणांच्या निवासस्थानी गेले. पुण्याहून आलेल्या तिघांनी शासकीय रुग्णालयात क्वारंटाईन होणे गरजेचे आहे, असे समजून सांगू लागले. मात्र, या तरुणांच्या कुटुंबीयांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्याने धनेगावचे सरपंच दिलीप गजभारे यांना दिली.
याबाबत माहिती मिळताच गजभारे त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत आरोग्य सेवक आणि सरपंचांना जबर दुखापत झाली आहे. मारहाण सुरू असताना गावातील काही नागरिक गजभारे यांच्या मदतीला धावून आले. नागरिकांनी मारहाण करणाऱ्यांनाही चोप दिला.
या घटनेची माहिती कळताच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप कच्छवे आणि इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी गेले. आरोग्य कर्मचारी आणि सरपंचावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.