नांदेड - इसापूर धरणाचे पाणी इतरत्र वळविण्याचा निर्णय भाजप शासनाने घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. आम्ही खरे आहे तेच बोलतो. इसापूर धरणाचे पाणी इतर भागात वळविण्यासाठी मी काही निर्णय घेतले हे विरोधकांनी सिध्द केल्यास सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन. तसेच जे लोक स्वतःला नांदेड जिल्ह्याचे हितकर्ते समजतात त्यांनी शासनाने घेतलेला निर्णय बदलून दाखवावा. आम्ही सुध्दा त्यांच्या सोबत आहोत, असे जाहीर आवाहन अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षरित्या खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांना केले.
भाऊराव चव्हाण साखर कारखान्याची २६ वी सर्वसाधारण सभा झाली. या सभेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. चव्हाण पुढे म्हणाले की, केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका या साखर कारखान्याला बसला आहे. त्यामुळे उसाला जादा भाव व साखरेला कमी भाव या व्यस्त प्रमाणाचा तडाखा साखर उद्योगाला बसत आहे. साखरेला आधारभूत किंमत देण्यासाठी तीन वर्ष लागले. त्यामुळे भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे ७५ कोटींचे नुकसान झाले. तसेच देशात मंदीचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे सुमारे ५५ हजार कामगारांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. भविष्यात अशीच अर्थिक परिस्थिती राहिली तर आवश्यक वाटल्यास भाऊरावचे एक किंवा दोन युनिट विकावे किंवा भाडे तत्वावर द्यावे लागतील, अशी भीतीही चव्हाणांनी यावेळी व्यक्त केली.
सर्वसाधारण सभेत भाऊरावचे एक किंवा दोन युनिट विक्री किंवा भाडे तत्वावर देणे यासह विषय पत्रिकावरील अकरा विषयांवर चर्चा होऊन सर्व ठराव पारित करण्यात आले. तर आयत्या वेळीच्या विषयात काही सभासदांनी कारखान्याची अर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन उसाची एफ. आर. पी. रक्कम देण्यास सन २०१५ मध्ये उशीर झाला. त्याच्या व्याजाची रक्कम न मागण्याचा विषय मांडला व तो मंजूर करण्यात आला. गेल्या वर्षापासून इसापूर धरण्याच्या पाण्याचा प्रश्न अशोक चव्हाण यांनी लावून धरला आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, इसापूरचे पाणी इतर ठिकाणी वळवल्यास सुमारे १५ हजार हेक्टरच्यावर शेती सिंचनापासून वंचित राहणार आहे. खासदार हेमंत पाटील, माजी खासदार शिवाजी माने यांनी हिंगोली जिल्ह्याच्या बाजूने भुमिका घेतली असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. तसेच पाण्यासाठी जनआंदोलन करण्यात येईल. कारखाना कधी राजकारणाचा अड्डा केला नाही किंवा राजकीय लाभ लक्षात घेऊन निर्णय घेतला नाही. ज्यांनी विमा दिला नाही, ज्यांनी कर्जमाफी दिली नाही. त्यांना जाब न विचारता आम्हाला जाब विचारला जातो. झाले गेले ते विसरून जा. मला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नरेंद्र चव्हाण यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी धर्माधिकारी यांनी केले तर प्रा.कैलास दाड यांनी आभार मानले. यावेळी अध्यक्ष गणपतराव तिडके, आमदार अमिता चव्हाण, जया चव्हाण, बायोशुगरचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण, भाऊरावचे उपाध्यक्ष प्रा. कैलास दाड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, उध्दवराव पवार, बालाजी पाटील गव्हाणे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.