नांदेड- देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. सर्वत्र जमावबंदी व संचारबंदी सुरू आहे. जिल्ह्यात सर्वत्र दैनंदिन कामे बंद आहेत. पालकमंत्री अशोक चव्हाण मात्र नांदेडमध्ये दीर्घकाळ मुक्काम ठोकून नांदेड कोरोनापासून कसे मुक्त राहील याबाबत उपाययोजना राबवत आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील विविध विकासकामे सुरू करण्यासह राज्यातील विविध कामांचा दररोज आढावा घेत आहेत. दुर्दैवाने कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढला तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ५५ हजार बेडचे नियोजन तयार आहे.
अशोक चव्हाण काही वर्षांनंतर पहिल्यांदाच नांदेडला दीर्घ काळासाठी मुक्कामी आहेत. अशोक चव्हाण यांची नांदेडचे म्हणून ओळख असली तरी यापूर्वी सलग इतका दीर्घकाळ ते नांदेडला राहिलेले नाहीत. अगदी निवडणूकीच्या काळातही ते राज्यभर फिरत असतात. मात्र, आता कोरोनामुळे ते गेल्या एक महिन्यापासून शहरात मुक्कामी आहेत. देशातील रेल्वे , विमानसेवा बंद असल्याने ६०० किलोमीटरचा मुंबईचा प्रवास टाळत चव्हाण नांदेडमध्येच आहेत. असे असले तरी ते घरात बसून राहिलेले नाहीत. रोज कुठे न कुठे फिरुन ते जिल्ह्याचा आढावा घेत आहेत. त्यामुळे कोरोनाने आजवर कधीच झाल्या नाहीत अशा अनेक घटना घडवून आणल्या आणि या गोष्टीला स्वतः चव्हाण यांनीही दुजोरा दिला आहे.
“नांदेडमध्ये एवढा वेळ राहिला मिळतोय, याचा आनंद आहे. जबाबदारी जास्त आहेत. राज्य स्तरावर अनेक जिल्ह्यात जावे लागते. मुंबईत मुख्यालय असल्यामुळे सरकार मुबईहून चालते. पण कोरोनामुळे गेल्या २० ते २५ दिवसांपासून आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आहोत. मुख्यमंत्र्यांच्या सल्ला आणि सूचनेनुसार पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात राहिले पाहिजेत. मला आनंद आहे की, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व भागातील लोकांशी संवाद साधता येतोय. कोरोनामुळे लोक त्रस्त झाले आहेत. आपल्याकडून जेवढी मदत करणे शक्य आहे तितकी मदत करतोय”, असे अशोक चव्हाण म्हणाले.
अशोक चव्हाण सलग इतका काळ जिल्ह्यात असल्याने त्यांचे जिल्ह्यातील रस्ते, स्वच्छता यावर त्यांचे बारीक लक्ष आहे. नांदेडच्या विकासाच्या नवनवीन कल्पनांबाबत ते अधिकाऱ्यांशी चर्चा करतात. सोबतच कोरोनाविरोधातील लढाईत त्यांचा प्रत्यक्ष आणि सक्रिय सहभाग आहे. त्यांचा हा दिर्घकाळाचा मुक्काम नांदेडकरांच्या पसंती उतरला आहे. हे प्रेम कायम टिकवण्यासाठी त्यांनी अधूनमधून असे दीर्घ मुक्काम नांदेडला करावा, अशी भावना नांदेडकर व्यक्त करत आहेत.
अशोक चव्हाण यांचे वडील आणि महाराष्ट्राचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण हे राज्याच्या स्थापनेपासून मंत्रिमंडळात होते. त्यामुळे अशोक चव्हाण यांचे संपूर्ण बालपण आणि शिक्षण मुंबईतच झाले. एम.बी.ए. चे उच्च शिक्षण घेत चव्हाण यांनी मुंबईतच व्यवसायात जम बसवलेला आहे. त्यामुळे दिवाळीचे चार दिवस सोडले तर ते कधीच सलग दीर्घकाळ नांदेडला राहिलेले नाहीत.