नांदेड - प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी महाराष्ट्राच्या विकासात नांदेड अग्रस्थानी राहिले पाहिजे, असे मत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ केले आहे. या योजनेचा फायदा जिल्ह्यातील दोन लाख वीस हजार सातशे शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या 100 जागांवरून 150 जागांना मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कॅन्सर ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी पोलीस विभागाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले. विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दतराम राठोड यांसह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.