नांदेड - कलम ३७० रद्द होण्यापूर्वी जम्मू व काश्मीरात १५ ऑगस्टला तिरंगा फडकत नव्हता हे मुख्यमंत्र्यांचे बारड (ता.मुदखेड) येथील विधान धादांत खोटे आहे. अशी निराधार माहिती देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यापासून २००३ पर्यंत, नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर तिरंगा का फडकला नाही? याचा खुलासा केला पाहिजे, असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीचा जुना पैलवान भाजपच्या तालमीत, माजी आमदार बापू पठारे भाजपात
दरम्यान, कलम ३७० चा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. पण, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांचा, बेरोजगारांचा, लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचा असंतोष उफाळून येऊ नये म्हणून भाजपच्या दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या झाडून साऱ्या नेत्यांनी कलम ३७० जप सुरू केला असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केला आहे.
हेही वाचा - बाळा..मी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, पवारांची मुख्यमंत्र्यांना मार्मिक समज
बारड (ता.मुदखेड) येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर अशोक चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, भाजप-शिवसेना सरकारच्या या खोटारडेपणाला आणि आजवर केलेल्या फसवणुकीला जनता मतदानातूनच चोख प्रत्युत्तर देईल, असे सांगितले. नांदेड जिल्ह्याच्या हक्काचे पळवले जाणारे पाणी हा जिल्ह्यातील सर्वात ज्वलंत प्रश्न आहे. मात्र, इतक्या गंभीर मुद्याचा मुख्यमंत्र्यांना साफ विसर पडतो. याबाबत ते आपल्या भाषणात स्वतःहून चकार शब्दही काढत नाहीत. मुख्यमंत्र्याचे भाषण संपल्यानंतर खासदारांना त्यांनी या विषयावर बोला म्हणून विनवणी करावी लागते, या प्रकारातून जिल्ह्याच्या या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत भाजप-शिवसेना सरकार व मुख्यमंत्र्यांची निष्काळजीपणा सिद्ध झाल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
नांदेड जिल्ह्याच्या पळवल्या जाणाऱ्या पाण्याबाबत बारड येथील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून एकाही शब्दाने उल्लेख केला नाही. भाजप शिवसेनेच्या सरकारने नांदेड जिल्ह्याच्या हक्काचे पाणी पळवण्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. हा प्रश्न नांदेड जिल्ह्यासाठी जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून एक शब्दही बोलू नये, हे नांदेड जिल्ह्याचे दुर्दैव आहे. मुख्यमंत्र्यांना या जिल्ह्याची फार काळजी आहे, असा आव विद्यमान खासदार वारंवार आणतात. पण, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून नादेड जिल्ह्याबाबतचा त्यांचा कळवळा किती तकलादू आहे, ते स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात खराब रस्त्यांचा उल्लेख केला. पण, मागील पाच वर्ष केंद्रातील राष्ट्रीय महामार्ग खाते आणि राज्यातील सार्वजनिक बांधकाम खाते भाजपकडेच आहे. नितीन गडकरी व चंद्रकांत पाटील यांच्यासारखे भाजपमधील वजनदार नेते या खात्यांचे मंत्री आहेत. जिल्ह्यातील रस्त्यांच्या दूरावस्थेचा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्र्यांनी आपल्याच पक्षातील मंत्र्यांची अकार्यक्षमता समोर आणली, असेही अशोक चव्हाण म्हणाले.