नांदेड - शासनाच्या निर्णयाप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत मिळण्यासाठी संबंधितांना सूचना द्यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्धापूर तालुका पत्रकार संघ आणि भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात अनेक गावात पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजनेच्या घरांचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून वाळू अभावी घरकुलांची कामे बंद पडण्याचा मार्गावर आहेत. तर वाळू अभावी अनेकांची कामे रखडली आहेत.
जिल्ह्यातील 8 हजाराच्यावर लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही. काही बांधकाम सुरूच झाली नाहीत. घरकुल लाभार्थ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन दिली. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. जिल्ह्यात वाळू माफियांची दहशत निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघासह जिल्ह्यात वाळू अभावी घरकुलांचे बांधकाम बंद पडण्याचा मार्गावर आहे.
हेही वाचा - जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ४६२ कोटींच्या आराखड्यास मंजुरी - पालकमंत्री अशोक चव्हाण
पोलीस आणि महसूल यंत्रणा वाळूच्या गैरव्यवहारकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत असल्यामुळे गरीब जनता भरडली जात आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना विना रॉयल्टी 50 ब्रास वाळू देण्याच्या निर्णयाची अमंलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना द्याव्यात, या मागणीचे निवेदन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
निवेदनावर अर्धापूर नगरपंचायत गटनेते अॅड किशोर देशमुख, प्रदेश सचिव सखाराम क्षीरसागर, माजी उपसभापती लक्ष्मण इंगोले, भाजप तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, विराज देशमुख, माजी तालुकाध्यक्ष सुधाकर कदम, उध्दव कदम, योगेश हळदे, विलास साबळे, तुकाराम माटे, शैलेश लोमटे, परमेश्वर लालमे, संतोष पवार आदींच्या सह्या आहेत.
हेही वाचा - पोलीस निरीक्षकांच्या बदल्या नियमबाह्य, महासंचालकांकडे तक्रार