नांदेड- महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे नगरसेवक अमितसिंह तेहरा यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्यासह उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नांदेड शहराची भारतभर ओळख असून हे शहर स्वच्छ आणि सुंदर रहावे. यासाठी आपण विशेष लक्ष देणार असल्याचे सांगत नवनियुक्त सभापती तेहरा यांनी सांगितले. शहर वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाची मदत घेण्यात येणार आहे. रस्ते दुभाजक आणि फूटपाथ यांचे सुशोभीकरण करण्याचा मानस आहे. तसेच हॉकर्स झोनची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील भाजप सरकारच्या काळात महापालिकेला निधी कमी मिळाला. आता महाआघाडीचे सरकार राज्यात असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून महापालिकेला विकासकामांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी देखील आपण नागरिकांना वेळेवर कर भरण्याचे आवाहन करणार आहोत. जेणेकरुन चांगल्या पद्धतीने विकासकामे करता येतील असा विश्वास स्थायी समिती सभापती अमितसिंह तेहरा यांनी व्यक्त केला.
निवडीच्या वेळी प्रभारी नगरसचिव अजितपालसिंघ संधू, उपायुक्त सुधीर इंगोले, विलास भोसीकर यांच्यासह महापौर दीक्षा धबाले, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि स्थायी समितीच्या सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. सभापतीपदी निवडीसाठी तेहरा यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अमिता चव्हाण, डी . पी . सावंत, अमर राजूरकर, मोहन हंबर्डे यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी यांचे आभार मानले.