नांदेड - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात काल (शुक्रवार) संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. हे आंदोलन सकल मराठा समाजाचे असून या आंदोलनामध्ये लाखो मराठा बांधव व मराठा समाजातील संघटना, समाजातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तरी अशोक चव्हाण यांनी नांदेड येथील आंदोलन हे भाजपाप्रणीत असल्याचा आरोप केला होता. तो आरोप बिनबुडाचा आहे, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे राज्याचे समन्वयक माधवराव पाटील देवसरकर यांनी दिली आहे.
आंदोलनात सर्व पक्षाचे नेते उपस्थित -
नांदेड येथे काल संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात भव्य मराठा आरक्षण मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा खासदार हेमंत पाटील, शिवसेना आमदार राम पाटील रातोळीकर, भाजपा आमदार मोहन अण्णा हंबर्डे, काँग्रेस आमदार माधवराव पाटील जवळगावकर, काँग्रेस आमदार तुषार राठोड, भीमराव केराम, भाजपा आमदार बालाजी कल्याणकर, शिवसेना जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, काँग्रेस महापौर मोहिनी येवणकर, काँग्रेस पक्षाचे तीनही जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे तीनही जिल्हाध्यक्ष, भाजपाचे चारही जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष यांच्यासह विविध पक्षाचे जिल्हाध्यक्ष, मराठा समाजातील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, माजी आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील विविध गावचे सरपंच चेअरमन यांच्यासह मराठा समाजातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले आहे.
'अशोक चव्हाण यांना समाजच धडा शिकवेल'
अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाच्या हिताचे काम करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, समाज स्वागतच करेल अन्यथा समाजाच्या कार्यक्रमाला यापुढे उपस्थित नाही राहिले तर समाज योग्य धडा त्यांना शिकवल्याशिवाय राहणार नाही. समाजातील तरुण समाज बांधवात यांची जागृती मोठ्या प्रमाणावर झाली असून समाजाला आरक्षणाची झळ मोठ्या प्रमाणावर बसत आहे. यामुळेच यापुढील काळात सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजासाठी जे लोकप्रतिनिधी काम करतील त्यांच्या बाजूने राहणार व नाही आले त्यांना योग्य ते धडा शिकवल्याशिवाय समाज गप्प बसणार नाही. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाच्या मागण्यांची दखल न घेता केवळ आपल्यावर येऊ नये, यासाठीच सकल मराठा समाजाच्या मोर्च्यावर बिनबुडाचे आरोप करत असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक माधव देवसरकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - कायद्याचा रक्षकच निघाला भक्षक, अल्पवयीन मुलीचा विनभंग करणाऱ्या पोलीस शिपायाची जेलमध्ये रवानगी