नांदेड - देशाचे माजी गृहमंत्री डॉ. शंकरराव भाऊराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत बंगळुरू विद्यापीठाने बाजी मारली. तर, मद्रास विद्यापीठाला उपविजेतेपद मिळाले आहे.
हेही वाचा - WWE मधील सामने फिक्स असतात!... 'द ग्रेट खली'ने केला गौप्यस्फोट
व्हीबीएस पूर्वांचल विद्यापीठ, उत्तर प्रदेश संघाने या स्पर्धेत तृतीय तर, मुंबई विद्यापीठाने चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला. यशवंत महाविद्यालयाच्या इनडोअर हॉलमध्ये हे सामने पार पडले. बंगळूरू आणि मद्रास यांच्यातील अंतिम सामन्यात ८९-७६ अशा गुणफरकाने बंगळुरू संघाने विजय नोंदवला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीसाठी व्हीबीएस पुर्वांचल विद्यापीठाने मुंबईवर ६९-६७ अशी मात दिली. सर्व विजयी खेळाडूंना माजी मंत्री तथा शारदा भवन शिक्षण संस्थेचे सचिव डी. पी. सावंत यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
यावेळी कुलगुरू प्रा.जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, उध्दवराव निंबाळकर, माजी प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, नरेंद्र चव्हाण, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दिपक बच्चेवार आदींची उपस्थिती होती. तर, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. गंगाधर तोगरे, डॉ. बळीराम लाड, जी. बी. मदने, डॉ. उत्तम धुमाळ, डॉ. राहुल वाघमारे, विनोद जमदाडे, प्रा. रमेश नांदेडकर, रघुनाथ, कऊटकर, संतोष स्वामी, गोविंदसिंह ठाकूर आदीमनी परिश्रम घेतले.