नांदेड - राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करत आयटीआय चौकात आंदोलन केले. आरोग्यसेवक व इतर परीक्षा सरकार घेत आहेत. परंतु राज्यसेवेची पूर्व परीक्षा वारंवार पुढे ढकलत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला. तसेच ही परीक्षा लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यावेळी विद्यार्थ्यांनी दिला.
विद्यार्थ्यांच्या भावनांचा सन्मान करावा -
कोरोनामुळे 2020 मध्ये अनेक वेळा परीक्षेच्या तारखेत बदल झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना सतत अनिश्चिततेला सामोरे जावे लागले. अनेक वर्षांपासून स्पर्धापरीक्षा करणारे विद्यार्थी आर्थिक व मानसिक त्रासातून जात आहेत. 14 मार्चला ठरलेली राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रद्द करून परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भावनांचा सन्मान करावा, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते बालाजी पाटील गाढे यांनी केली आहे.
हेही वाचा - टाकाऊतून स्वछतेचा संदेश..! भंगारातील साहित्यापासून सांगलीत साकारले अनोखे 'उद्यान'