नांदेड : नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचणारे बॅनर अज्ञातांनी लावल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यास कुणीही उपलब्ध होऊ शकले नाही. मात्र भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हेच खरे असल्याचे स्पष्ट केले. मात्र, लावलेले बॅनर हे भांडण लावणारे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अप्रत्यक्षपणे खासदारांनी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हेच मान्य केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र हे खरे आहे मात्र, नांदेड शहरात खोडसाळपणाने बॅनर लावले आहे, असे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे.
पन्नास खोके 105 डोके : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वी देशात नरेंद्र राज्यात एकनाथ शिंदे अशा आशयाची पेपरमधे जाहिराती दिल्या होत्या. त्या नंतर भाजपाच्या वतीने नाराजी तीव्र करण्यात आली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटाबद्दल कुठलेही वक्तव्य तथा बॅनर न लावण्याच्या सूचना केल्या होत्या. पण तरीही नांदेडमध्ये पन्नास खोके 105 डोके, देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्रच अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले.
देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र : या बॅनरवर देवेंद्र फडणवीस समर्थक आशयाचा मजकूर देखील लिहिण्यात आला. त्यामुळे या बॅनरने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. भाजप, शिंदे गटात बॅनरवार सुरू झाले की काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. भाजपच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी मात्र, देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र या भूमिकेवर आपण स्पष्ट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एकत्र राहणारे शिंदे फडणवीस सरकार यामध्ये दूरी निर्माण झाल्याच्या भावना स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागल्या आहेत. नांदेड शहरातील आयटीआय चौक येथे अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या बॅनरमुळे संक्षिप्त प्रतिक्रिया उमटत आहे. महापालिकेने हे बॅनर काही क्षणात काढल्याने परत चर्चांना उधाण आले आहे.