नांदेड - जिल्ह्यात विविध अपघातात बेवारस पडलेल्या वाहनांचे साहित्य चोरी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा अनेक घटना नांदेड-नागपूर महामार्गावर अलीकडच्या काळातच पाहायला मिळत आहेत.
नांदेड-नागपूर महामार्गावर अर्धापूर तालुक्यात पार्टी परिसरात अपघातग्रस्त वाहनांचे सामान चोरी करणारी टोळी गेल्या एक वर्षापासून कार्यरत आहे. अशा चोरीच्या अनेक घटना या महामार्गावर झाल्या आहेत. या महामार्गावरील अर्धापूर तालुक्याच्या हद्दीत अपघातग्रस्त वाहनावर पाळत ठेवून रात्री त्या वाहनांचे महत्वाचे सामान खोलून घेऊन जाण्याच्या घटनात कमालीची वाढ झाली आहे.
अलीकडेच राजहंस मंगल कार्यालयाजवळ रस्त्यालगत अपघातग्रस्त ऑटोला जाळून दुसऱ्या दिवशी रात्री या ऑटोचे लोखंडी सामान चोरून नेले होते. तर अन्य एका घटनेत बायपासजवळ एका दुचाकीचे सामान रात्रीच खोलून चोरून नेले होते. पार्डी येथे पांगरी येथील एका अपघातग्रस्त दुचाकीचे साहित्य नेण्याच्या बेतात असलेल्या चोरट्यांना नागरिकांचा सुगावा लागल्याने पलायन करावे लागले.
अपघातग्रस्त वाहनांचे साहित्य खुले करण्यासाठी दारुड्यांचाही वापर केला जात असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. यापूर्वी औषधी दुकाने फोडणारी टोळी, बैलजोडी चोरांच्या टोळीने तालुक्यात हैदोस घातला होता. आता अपघातग्रस्त वाहनांचे साहित्य चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. यामुळे वाहनचालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. महामार्ग पोलिसांनी याकडे लक्ष देऊन रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.