नांदेड - श्री रेणुकादेवी माहूर गडावर ऑटो पलटी झाल्यामुळे दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. ही घटना आज (दि.२) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.
भगवान गिरी महाराज, आष्टी यांच्या प्रतिवर्षीच्या रथ सप्तमीनिमित्त पायी दिंडीतून माहूर येथील दत्तशिखर येथे भाविक आले होते. दोन दिवस मुक्कामी राहून आज सकाळी काकडा आरती समाप्तीनंतर ऑटोने (एमएच-२६ एसी ४७६२) ते आपल्या गावाकडे निघाले होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने रेणुकादेवी घाटातील निळकंठेश्वर मंदिराजवळ ऑटो पलटी होऊन अपघात झाला. मृत व जखमी पोटा (बु.) व पोटा (खु.) (ता.हिमायतनगर) येथील रहिवासी आहेत.
हेही वाचा - ''तुमच्यासारखे व्हिलन आजूबाजूला असतील तर त्यांचा सुपडा साफ करायला आम्हाला फार वेळ लागणार नाही''
सरस्वती सुभाष माने (वय ५० रा.पोटा) या महिलेला गंभीर मार लागल्याने माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर सहा जणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नांदेड येथे गुरू गोविंदसिंग रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, इंदुबाई किसन माने (वय ५० रा.पोटा) यांचा हदगावजवळ प्रवासात मृत्यू झाला. तर सुमित्रा आनंदराव सूर्यवंशी (वय ४५), शोभाबाई दिगंबर सूर्यवंशी (वय ५०), आशाबाई उत्तमराव माने (वय ३५), धनश्री संतोष वालगावकर (वय १), प्रयागबाई नारायण वालेगावकर सर्व (रा.पोटा) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नांदेड येथील गुरुगोविंदसिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - गड-किल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांची खैर नाही, गृह खात्याचा नवा निर्णय
आ. माधवराव पाटील-जवळगावकर यांना घटनेची माहिती मिळताच माजी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष जि.प.सदस्य संजय राठोड यांनी ग्रामीण रुग्णालय गाठून भाविकांना बचावकार्य व मदत केली. यावेळी पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, स.पो.नि.अण्णासाहेब पवार, पो.उपनि शरद घोडके, पो.हे.कॉ.सुशील राठोड यांनी घटनास्थळ पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान, वाहनचालक हा अपघात झाल्यापासून फरार झाला असून पुढील तपास पोउपनि घोडके करत आहेत.