नांदेड - नायगाव नगरपंचायतमधील कंत्राटी कामगार आनंदराव रोडे यांनी हेडगेवार चौकातील भारतीय स्टेट बँकेच्या खिडकीला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी, बँकेने कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यानेच आत्महत्येची घटना घडल्याची नोंद पोलीस डायरीमध्ये करण्यात आली आहे.
आर्थिक महामंडळ कडून केली होती फाईल
नायगाव तालुक्यातील देगाव येथील रहिवासी असलेले आनंदराव रोडे हे नायगाव नगरपंचायतमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी सुशीलाबाई आनंदा रोडे यांच्या नावे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून २०१८ मध्ये किराणा दुकान टाकण्यासाठी ५ लाख रुपये कर्ज मंजूर झाले होते. तसे, पत्र बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक यांना दिले होते. त्यात १५ दिवसात कार्यवाही करण्यासाठी सांगितले होते. पण, बँकेने सदरचे कर्ज न देता फाईल दडपून ठेवली. त्यामुळे रोडे हे शाखा व्यवस्थापकांना कर्ज देण्याबाबत अनेकदा भेटले तरीही, टाळाटाळ करण्यात येत होती. दरम्यान, मंजूर झालेले कर्ज तब्बल तीन वर्षांपासून मिळत नसल्याने अर्थिक विवंचनेत असलेल्या आनंद रोडे यांनी बँकेच्या भिंतीला असलेल्या खिडकीला दैर लावून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
नायगाव ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद
सदरची माहिती समजताच पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी घटनास्थळी भेट देवून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून सदर प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक बाचावार हे करत आहेत.
दलालांमार्फत आलेल्याचे फाईली निकाली
पोलीस ठाण्यात नोंद करतांना बँकेने कर्ज न दिल्याने आत्महत्या करण्यात आल्याची नमूद करण्यात आले असून या प्रकरणी चौकशी नंतर पुढील कायवाई होण्याची शक्यता आहे. पण या आत्महत्येने नायगाव शहरातील दोन बँकेच्या शाखेत दलालांची टोळी सक्रिय असल्याची जोरदार चर्चा होत असून या बँकाचे अधिकारी दलालांच्या माध्यमातून येणाऱ्या फाईलीच निकाली काढतात अशी जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे ही फाईल. अडवण्यात कोणत्या दलालाचा हात आहे का याचाही शोध नायगाव पोलिसांना घ्यावा लागणार आहे.