नांदेड - कोरोना व टाळेबंदीसारख्या संकटकाळात शहर स्वच्छतेची महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना आर अँड बी कंपनी आणि पालिका प्रशासनाने परवडत नसल्याचे कारण देवून कामावरुन कमी केले आहे. यावरून कामगार संघटना आक्रमक झाली आहे. कामावरुन कमी केलेल्या या कामगारांना कामावर रुजू करुन घ्यावे. अन्यथा महापालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा मराठवाडा नगर पालिका, महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
मागील 15 ते 20 वर्षांपासून विविध कंत्राटदारामार्फत शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कोरोना व टाळेबंदी सुरू होताच एप्रिलमध्ये कामावरुन कमी केले आहे. एकीकडे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री कुठल्याही क्षेत्रातील कामगारांना कामावरुन कमी करु नका, अशा सुचना दिल्या. मात्र, महानगरपालिकेत स्वच्छतेचे कंत्राटदार असलेल्या आर अँड बी कंपनीने कचऱ्याचे वजन भरत नसल्यामुळे आपल्याला परवडत नाही, असे कारण देत बहुसंख्य कामगारांना कमी केले आहे.
वास्तविक नांदेड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू, नये म्हणून या कंत्राटी कामगारांनी स्वतःची व कुटुंबियांच्या जीवाची पर्वा न करता शहर स्वच्छतेची महत्वाची कामगिरी बजावली. पण, आडमुठ्या कंत्राटदार व महापालिका प्रशासनाने या कामगारांच्या रोजगारावर घाला घातल्यामुळे दोन महिन्यापासून त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावली आहे.
कंत्राटदार, महापालिका प्रशासन, कामगार विभागाकडे वारंवार तक्रारी करुनही दखल घेतली जात नसल्याने या कामगारांसमोर नाईलाजाने उपोषणाचा मार्ग उरला आहे. या कामगारांना 15 जूनपर्यंत पूर्ववत कामावर न घेतल्यास महापालिका कार्यालयासमोर कामगार बेमुदत उपोषण करतील, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर कामगार नेते प्रदीप नागापूरकर, के. के. जांबकर, मुक्ताबाई धुतडे, संजय वैद्य, सुभाष कोल्हे, आंबादास कंदीलवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हेही वाचा - नांदेड : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल