नांदेड - ग्रामीण भागात अनेक सुप्त असलेल्या काही आयडीया असतात. भारी जुगाड करून येथील लोक आपले काम भागवत असतात. एका मोठ्या इंजिनिअरला मागे टाकणारी यांची कल्पकता कधी-कधी पुढे असते. जिल्ह्यातील पिंपळगाव महादेव (ता. अर्धापूर) येथील एका फुल उत्पादक शेतकऱ्याने दररोजचा पेट्रोल खर्च परवडत नसल्यामुळे काही आयडीया शोधली आहे. त्यांनी जुन्या मोटारसायकलवर प्रयोग करून चार्जिंगवर चालणारी दुचाकी बनवली आहे. यासाठी सदरील शेतकऱ्याने दोन वर्षे मेहनत घेऊन फक्त १४ रुपयांच्या खर्चामध्ये १०० किमी अंतर पार करता येईल, अशी ईलेक्ट्रिक दुचाकी बनवली आहे.
ज्ञानेश्वर उमाजीराव कल्याणकर असे या ३० वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे ते राहतात. दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या किमती आणि वाढते प्रदूषण या सध्याच्या काळातील मोठी समस्या बनली आहे. त्याला पर्यायी मार्ग म्हणून आजकाल लोक पेट्रोल बाईक किंवा स्कूटरऐवजी इलेक्ट्रिक बाईक्सचा पर्याय पुढे येत आहे. अशातच ज्ञानेश्वर यांनी पर्यावरण पूरक चार्जिंगची दुचाकी बनवली आहे. शेतातील कामे, फुले बाजारपेठेत नेणे आणि शेतात जाण्यासाठी चार्जिंग दुचाकी बनवली आहे.
फुल उत्पादक शेतकरी
पिंपळगाव शिवारात पारंपारिक पद्धतीने शेती न करता विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेत ज्ञानेश्वर आणि त्यांचे भाऊ शेती करतात. गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाउन, लग्न समारंभ आदी कार्यक्रम छोटेखानी होत आहेत. फुल शेतीतुन येण्या-जाण्याच्या खर्च निघत नसल्याने तरूण शेतकऱ्याने लॉकडाउनमध्ये चार्जिंगवरील मोटारसायकल बनवण्याचा प्रयोग करण्याचा संकल्प केला. त्याने विजेवर चालणारी मोटारसायकल तयार करण्याचे स्वप्न सत्यात उतरविले.
बाईक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
अवघ्या दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या ज्ञानेश्वर या शेतकऱ्याने इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणारी प्रदूषण मुक्त अशी मोटारसायकल तयार केली आहे. फक्त १४ रुपये खर्चामध्ये चार तास चार्ज केल्याने तब्बल १०० किमीचे अंतर पार करता येते. ही मोटारसायकल बनवण्यासाठी बॅटरीच्या दर्जानुसार २६ ते ४० हजार रुपये खर्च येतो. दरम्यान, पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहने अनेकांनी बघितली आहेत. मात्र, चार्जिंगवर बनवलेली मोटारसायकल परिसरात पहिल्यांदाच बनवण्यात आली. ही दुचाकी पाहण्यासाठी गावातील नागरिक मोठी गर्दी करत आहे.
आर्थिक मदतीचा हात मिळावा
चार्जिंग मोटरसायकल बनवण्यासाठी ज्ञानेश्वर यांना सुमारे ४० हजार रुपये खर्च आला. मोटार ७५० होल्ट, बॅटरी ४८ होल्ट, चार्जर, कंट्रोलर, लाईट, एक्सलेटर, इलेक्ट्रिक ब्रेक आदी यात बसविण्यात आले आहे. ज्ञानेश्वर अल्पभूधारक शेतकरी आहे. यापेक्षाही चांगले नवनवीन प्रयोग यशस्वी करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी आर्थिक मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली.