नांदेड - श्री गुरुनानक देवजी महाराज यांचे पावन प्रकाश पर्व आहे. त्यानिमित्ताने श्री गुरुनानक देवजी महाराज यांनी दिलेल्या मानवतावादी संदेशाचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे. त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गुरु नानक प्रकाश यात्रेला २ जूनपासून प्रारंभ होणार आहे. ही यात्रा गुरुव्दारा नानक झिरा साहिब, बिदर येथून अरदास करुन प्रारंभ होऊन सायंकाळी ७ वाजेपर्यंत तख्त सचखंड श्री हजुर साहिब पोहोचणार आहे.
श्री गुरुनानक देवजी यांचा नोव्हेंबर महिन्यामध्ये ५५० वे प्रकाश पर्व (जन्मोत्सव कार्यक्रम) देशपातळीवर साजरे होणार आहे. गुरुव्दारा नानक झिरा साहिब, बिदर येथे या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. २ जून रोजी बिदर येथून निघालेली यात्रा सायंकाळी नांदेडमध्ये येणार असून यात्रेच्या स्वागतासाठी गुरुव्दारा बोर्ड प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. नांदेड शहरात जुना मोंढा ते गुरुव्दारा गेट नं.१ पर्यंत स्वागत कमानी, लाईटींग, डेकोरेशन, लंगर, प्रसाद, पोस्टर्स, बॅनर याव्दारे या यात्रेचा प्रचार, प्रसार करण्यात येत आहे.
भाविकांनी या यात्रेच्या स्वागतासाठी २ जूनला सायंकाळी ६.०० वाजता जुना मोंढा येथे जमावे. तसेच गुरुव्दारा गेट नंबर १ व दिनांक ३ जून रोजी सकाळी ७.३० वाजता दरबार साहिब येथून बाऊली साहिबपर्यत यात्रेला निरोप देण्यासाठी उपस्थित राहावे, गुरु साहिबांचा आशीर्वाद प्राप्त करावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.