नांदेड - उमरीहून काळ्या बाजारात विक्रीसाठी 341 क्विंटल तांदूळ नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडला आहे. (एम.एच-26 बी.ई-4119) हा ट्रक तांदूळ भरुन जवाहर नगर तुप्पा मार्गे जात होता, त्यावेळी पोलिसांनी या ट्रकवर कारवाई केली असून ट्रकमधील तांदूळ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
उमरीहून रेशनचा तांदूळ घेऊन जात असताना सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख व माधव देवसरकर यांना संशय आल्याने त्यांनी हे वाहन रोखले. तसेच त्यांनी व चालक शरद लक्ष्मण पवार (रा.उमरा ता. लोहा) याला तांदूळ कोठून आणला आहे? कोठे जात आहे? अशी विचारणा केली. त्यावेळी चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने सांगितले, की हा ट्रक उमरीतील हुसेन यांनी भरून दिला असून वर्ध्याला नेण्यास सांगितले. शिवाय गाडीची कोणतीही कागदपत्रे दिली नसल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
त्यानुसार घटनास्थळी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक दाखल होऊन त्यांनी वाहन ताब्यात घेतले व त्याची तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये रेशनचा 341 क्विंटल तांदूळ आढळून आला. हा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्याचा प्रयत्न होता, असे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी ही माहिती नायब तहसीलदार विजय चव्हाण यांना दिली. चव्हाण यांनी संबंधित तांदळाची तपासणी केल्यानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे अधिक तपास करीत आहेत.