हदगाव - कुत्र्याला मारल्याच्या कारणावरुन तिघांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना हदगाव तालुक्यातील हरडफ गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरोधात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ घटनेवरून झालेल्या मारहाणीत तिघे जबर जखमी झाले आहेत.
हदगाव तालुक्यातील हरडफ गावातील ग्यानोबा शिंदे यांच्या वासराला शेजारी असलेल्या दिगंबर जाधव यांचा कुत्रा चावा घेत होता. तेव्हा शिंदे यांच्या मुलाने कुत्र्याला काठी घेऊन पळवून लावले. जाधव आपल्या लाडक्या कुत्र्याच्या पाठीमागे काठी घेऊन लागलेल्या पोरांमुळे संतापले. यातून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला. ग्यानोबा शिंदे आणि दिगांबर जाधव एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने वाद वाढतच गेला. जाधवांची काही भावकी यावेळी तिथ जमा झाली आणि या मंडळींनी शिंदेच्या हातावर लाठ्याकाठ्यानी मारहाण केली. या मारहाणीत ग्यानोबा शिंदे यांचा हाथ मोडला, तर वाद सोडवण्यास आलेल्या शिंदे यांच्या पत्नी आणि मुलालाही जाधव कुटुंबाने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
या प्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हदगाव पोलीस ठाण्यात गुरनं. १५९/ २०१९ कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड काँस्टेबल श्रीगजवार करत आहेत. किरकोळ कारणामुळे गावात झालेल्या या हाणामारीमुळे ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करत आहेत.