नांदेड - कंधार तालुक्यातील गोणार येथील विवाहिता व दोन चिमुकल्यांची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या आरोपींना ३ दिवसांची पोलीस सुनावण्यात आली आहे. यामध्ये मृत महिलेचा पती व सासऱ्याचा समावेश आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले होते.
हे वाचलं का? - पैशासाठी विवाहितेसह २ चिमुकल्यांचा खून, पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गोणार येथील रंजना शरद पवळे (वय 27), मुलगा दिग्विजय (वय 9) व मुलगी वैभवी (वय 6) अशी मृतांची नावे आहेत. रविवारी तिघेही त्यांच्या शेताच्या शेजारी असेल्या विहिरीत पाण्यावर तरंगत होते. याची माहिती नातेवाईकांनी मृत विवाहितेच्या भावाला दिली. त्यानंतर कंधार पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा प्रक्रिया पूर्ण केली. तसेच ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, सासरच्या मडळींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृतांच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे तणावापूर्ण परिस्थिती बघता पोलिसांची मध्यरात्री मृत रंजनाचा पती शरद पंडीत पवळे आणि सासरा पंडीत नारायण पवळे या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांना अटक करून कंधार न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायाधीश तारे यांनी आरोपींना ५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.