नांदेड - महाराष्ट्र शासन कोरोना विरूद्धच्या लढाईत जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र, अर्धापुरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना विमा व मास्क, सॅनिटायझरसह इतर कोणत्याही सुरक्षित सेवा सुविधा देण्यात आल्या नसल्याने, त्यांना त्या देऊन डॉक्टर पोलिसांप्रमाणे विमा कवचही देण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. दरम्यान त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाकडून २५ लाख रुपयाच्या विम्याचे कवच देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर या बाहेर गावातून शहरात येणाऱ्या लोकांची घरोघरी जाऊन माहिती संकलीत करत सर्व्हेक्षण करत आहेत. तसेच कोरोना या आजाराविषयी माहिती व जनजागृती करत आहेत. ही कामे करताना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारने या बाबीची गांभिर्याने दखल घेऊन सेविकांना त्यांच्या शेष फंडातील काही रक्कम द्यावी. त्याचबरोबर सरकारने लागू केलेल्या संरक्षण विम्याचा लाभ मिळावा, आदी मागणी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ठाकरे यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
यावेळी रंजना शहाने, वंदनाबाई कांबळे, इंदुबाई कांबळे, नंदा साबळे, गोकर्णा, संगीता पवार, संगीता चव्हाण, शेख आयेशा, अंजली शिरसाठ, मंजुषा मेटकर, व्दारका सिनगारे, धम्मजोती सरोदे, सिमा धोत्रे, अनिता वाघमारे, शिवनंदा टोम्पे, धोंडाबाई शिनगारे, मनिषा मोटलवार, सुमन राऊत, ताईबाई शिवनकर, ललीता मेटकर, सुलोचना सावळे, गंगुताई मुळे, मिरा ईनामदार, अर्चना ठाकूर, मिना काळे, रेखा आसोरे, सुरेखा जडे, धम्मज्योती तारू, शेषकला सरोदे, वंदना पहुरकर आदींनी मागणी केली.
२५ लाखाच्या विम्याचे कवच
दरम्यान, कोरोना प्रतिबंधासाठी काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधना व्यतिरिक्त एक हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. या कर्मचाऱ्यांचा ९० दिवसांसाठी २५ लाख रुपयांचा विमा उतरवण्यासही मान्यता देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. दोन लाख ७३ हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. आमच्या निवेदनाची दखल घेऊन निर्णय घेण्यात आल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले. तसेच नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर शहरातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, यांनी सरकारकडे मास्क आणि सॅनिटायझरसह आवश्यक सुरक्षा साहित्य पुरवण्याची मागणी केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांकडून मास्कचे वाटप
शासनाकडून अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या सुरक्षेसाठी कोणतीच सुरक्षा किट मिळाली नाही. मात्र, सामाजिक कार्यकर्ते अॅड.किशोर देशमुख यांनी अंगणवाडी सेविक व मदतनीस यांना मास्कचे वाटप केले. शासनाने दुर्लक्षित केले तरी सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेतल्यामुळे त्यांचे सेविकांनी आभार व्यक्त केले.